इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
बदलत्या काळानुरूप नवनवीन तंत्रज्ञान येत असून स्पर्धाही वाढत आहे. या परिवर्तनामुळे आपल्यासारख्या जुन्या सूत गिरण्या बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देऊ शकत नाहीत. त्यामुळे सूत गिरणीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या चेअरमन सौ.किशोरी आवाडे यांनी केले.
इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मिलच्या कार्यस्थळी पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून सौ. आवाडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी वस्त्रोद्योगातील अडचणी व समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. सध्या नव्याने स्थापन सूत गिरण्यांकडे अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञान असल्याने स्पर्धा वाढत आहे. अशावेळी आपल्यासारख्या सूत गिरण्या स्पर्धेला तोंड देऊ शकत नाही. त्यासाठी मिलकडील मशिनरींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक निधीसाठी गिरणीकडील अतिरिक्त जमीन व कालबाह्य मशिनरींची विक्री करावी लागणार आहे. जमीन विक्री संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल. अहवाल सालात जुन्या मशिनरींची विक्री केली असून आजच्या सभेसमोरील या विषयास सर्वांनी मंजूरी द्यावी, असे सागितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अहवाल सालातील ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. सभा नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन संस्थेचे प्र. कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजूरी दिली.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक कल्लाप्पाण्णा आवाडे व क.आ. इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी आभार संचालिका सौ. संगिता नरदे यांनी मानले. यावेळी सर्व संचालिका व सभासद उपस्थित होते.
