इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
मध्यवर्ती हातमाग विणकर संघ संस्थेला एकूण नफा ५८ लाख ४९ लाखावर असुन तरतूद वगळता सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी केली. पारदर्शी व काटकसरीचा कारभार केल्याचे सांगत शासन हातमागास प्रोत्साहन देत असून त्यांच्यातर्फे महिलांना मानधनासह प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपला मूळ व्यवसाय हातमागाचा असून तो टिकवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
येथील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था कार्यालयात संपन्न झाली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन दत्तवाडे बोलत होते. त्यांनी संस्थेचा राखीव निधी १ कोटी ६० लाखा वर असून विविध बँका-पत संस्थातून चार कोटी ३६ लाखा च्या ठेवी आहेत. संस्थेच्या कापड दुकानात उच्चाकी विक्री झाली असुन नफाही झाला असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, शासनाने वस्त्रोद्योगाचे महत्व जाणले आहे. रेशम कोष धागा, विणकाम, रंगाई आणि साडी उद्योगाचा प्रकल्प डीकेटीईला दिला आहे. इचलकरंजीत कर्नाटक प्रमाणे मोठी साडीची बाजार पेठ करणे शक्य आहे. हातमागा वर पैठणी विणली पाहिजे असे नाही. तर जकॉर्ड वर दर्जेदार साडी उत्पादन होऊ शकते. हस्त कलेवरपुढील प्रक्रिया शक्य आहे.
इचलकरंजी मध्ये विणकर मजूर मिळत नाहीत. म्हणून महिलांना प्रशिक्षण देऊन कामातून आर्थिक लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. इचलकरंजी मध्ये दोन हजार यंत्रमागा वर साडीचे उत्पादन होते. रोज चार साडीचे उत्पादन या हिशोबात रोज दहा हजार साड्या विणल्या जातात. हातमागावर गुणवत्तापूर्ण सुंदर साडी पाच हजारास विकली जाते. शासनाच्या या उद्योगातील धोरणाचा लाभ घेतला पाहिजे. दहा टक्के स्वभांडवल निर्माण करून ९० टक्के शासना कडून निधी मी आणून देतो आणि ६० कोटीचा प्रकल्प उभा करण्यास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि उपस्थित मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्वागत संचालक चंद्रकांत मांगलेकर यांनी तर श्रद्धांजलीचा ठराव सौ. भारती जानवेकर यांनी मांडला. नोटीस व विषयपत्रिका वाचन सेक्रेटरी महेश पाटील यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आवाडे, भाजपा शहराध्यक्ष श्रीरंग खवरे आदींचा सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष निवृत्ती गलगले यांनी पसायदान म्हटले. आभार संचालक शिवबसू खोत यांनी मानले. यावेळी संचालक राहुल खंजिरे, शिवानंद बन्ने, मनोहर काकडे, धैर्यशील लोखंडे, श्रीमती सुधा जाधव, राहुल बंडगर, शिवानंद घोडके, जयवंत म्हेतर, विश्वनाथ अग्रवाल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
