मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करीत शिवसेना (उबाठ) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलंय. ”नगर विकास विभाग आणि सिडको महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा झाला असून, या विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांनी त्यातील किमान 20 हजार कोटी रुपये खिशात घातले आहेत, असा आरोप आहे. या रकमेपैकी 10 हजार कोटी रुपये दिल्लीतील ‘बॉस’ देण्यात आल्याचा खुलासा केला जात आहे, ज्याचा रोख तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहात”, असं राऊतांनी पत्रात म्हटलंय.
वनजमीन बेकायदेशीरपणे बिवलकर कुटुंबाला हस्तांतरित : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, असा नारा देत, भ्रष्ट व्यक्तींना सोडलं जाणार नाही आणि त्यांना तुरुंगात डांबलं जाईल, असं वचन जनतेला दिलं होतं. तथापि, वास्तव उलट असल्याचं दिसून येतं, कारण तुमच्या नेतृत्वाखालील तपास यंत्रणा भ्रष्ट व्यक्तींना संरक्षण देत आहेत”, असा टोला राऊतांनी लगावला आहे. राऊत पत्रात म्हणतात, ”रायगड जिल्ह्यातील हा जमीन घोटाळा धक्कादायक आहे. सरकारी नियंत्रणाखालील तब्बल 4 हजार 78 एकर वनजमीन बेकायदेशीरपणे बिवलकर कुटुंबाला हस्तांतरित करण्यात आली. 12.5 टक्के जमीन वाटप योजनेअंतर्गत, 30 वर्षांपासून अपात्र असलेल्या बिवलकर कुटुंबाला नगरविकास मंत्री आणि तत्कालीन सिडको अध्यक्षांनी मनमानीपणं पात्र ठरवलं. हे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची केवळ 25 दिवसांसाठी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, ज्या दरम्यान जमीन वाटप घाईघाईनं करण्यात आलं”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.
पात्रतेसाठी 20 हजार कोटींची लाच : आजही या भागातील हजारो प्रकल्पग्रस्त जमिनीपासून वंचित आहेत. सिडकोचे अधिकारी निर्लज्जपणे दावा करतात, की या गरीब आणि दुर्लक्षित प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी जमीन उपलब्ध नाही. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बिवलकर कुटुंबाला 50 हजार कोटी रुपयांची जमीन वाटप करताना असे कोणतेही अडथळे आले नाहीत. हे कुटुंब जमिनीसाठी पात्र नव्हतं, तरीही 20 हजार कोटी रुपयांची लाच देऊन व्यवहार करण्यात आला, असा आरोप राऊतांनी पत्रात केला आहे.
या घोटाळ्याला तुम्हीच जबाबदार : महाराष्ट्रात तुमच्या आश्रयाखाली चालणाऱ्या सरकारच्या कारभाराचं आणि राज्याच्या विध्वंसात तुम्ही कसं योगदान दिलं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सिडको अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मी मागणी करतो, की शिंदे आणि शिरसाट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि या 50 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करून गुन्हा दाखल करा. महसूल विभाग, नगरविकास विभाग, सिडकोचे अधिकारी आणि मंत्र्यांच्या संगनमतानं घडलेल्या या घोटाळ्यामुळं जनतेची फसवणूक झाली आहे. याला तुम्हीच जबाबदार असल्यानं, मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
