मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आज (19 ऑगस्ट) दुपारनंतर ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती पोतदार यांच्या मुलीनं दिली.
3 इडियट्समधून देशभर लोकप्रिय झाले : राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारून अच्युत पोतदार घराघरात लोकप्रिय झाले. या चित्रपटातील ‘क्या बात है’ आणि ‘कहना क्या चाहते हो?’ सारखे त्यांचे संवाद पॉप संस्कृतीचा भाग बनले. आजही त्यांचे हे संवाद सोशल मीडियावर मीम्ससाठी खूप वापरले जातात. अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत, मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयातील सहजता, नम्रपणा आणि आत्मीयता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मराठीत कुटुंबात जन्म : अच्युत पोतदार यांचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं बालपण इंदूरमध्ये गेलं. त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 1961 साली विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर काही काळ त्यांनी रीवा येथे अध्यापन केलं. पुढे भारतीय सैन्यात दाखल होऊन त्यांनी कॅप्टनपदापर्यंत सेवा बजावली. तर 1967 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर इंडियन ऑइल या सरकारी संस्थेत त्यांनी सुमारे 25 वर्षे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलं. 1992 साली वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
नोकरीसोबत नाटकांची आवडदेखील जपली : नोकरीसोबतच अच्युत पोतदार यांनी नाटकांची आवड जपली. इंडियन ऑइलमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख भूमिकेत सहभागी होत. तसेच, ते नाट्यप्रयोगांमध्येदेखील सक्रिय राहिले. सिनेमाच्या क्षेत्रात त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी प्रवेश केला. सैन्य आणि कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवून त्यांनी अभिनय हा छंद म्हणून जोपासला. चित्रपट क्षेत्रात मिळालेल्या संधी स्वीकारून त्यांनी त्या संधीच सोन केलं. त्यांनी कधीही स्वत:हून भूमिका मागितली नाही. विधू विनोद चोप्रा यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांत त्यांची उपस्थिती ठळकपणे दिसून येते.
125 हून अधिक हिंदी चित्रपटांत अभिनय- अच्युत पोतदार यांनी दबंग 2, फेरारी की सवारी आणि 3 इडियट्स यांसारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली. दूरदर्शनवरील ‘अमिता का अमित’ या मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. ‘प्रधानमंत्री’ या मालिकेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारली होती. सोबतच, त्यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘भारत की खोज’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. ‘महाश्वेता’ मालिकेतील त्यांची व्यक्तिरेखाही लक्षणीय ठरली होती. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेता म्हणून त्यांचं योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील. अच्युत पोतदार यांनी 125 हून अधिक हिंदी चित्रपटांत अभिनय केला आहे. याशिवाय, 95 दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, 26 नाटकं आणि 45 जाहिरातींमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
