नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी भारत आणि चीनमध्ये प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा झाली. वांग यी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली. भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताच्या तीन प्रमुख समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलंय. सोमवारी एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं की, चीन पृथ्वीवरील दुर्मीळ खनिजं, खते अनब बोगदा बोरिंग मशीनवर तोडगा काढण्यात भारताला मदत करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना आश्वासन दिलंय की, चीन भारताच्या खते, पृथ्वीवरील दुर्मीळ खनिजं अनब बोगदा बोरिंग मशीनच्या गरजांशी संबंधित तीन प्रमुख चिंता सोडवेल.
कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? : सोमवारी तत्पूर्वी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांच्या सुरुवातीच्या निवेदनात सांगितले की, चर्चेत आर्थिक आणि व्यापारी मुद्दे, तीर्थयात्रा, लोकांशी संपर्क, नदी डेटा शेअरिंग, सीमा व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि द्विपक्षीय देवाणघेवाण यांचा समावेश असेल. परराष्ट्र मंत्र्यांनी यंदा जुलैमध्ये चीनच्या भेटीदरम्यान उपस्थित केलेल्या चिंतांवर अधिक चर्चा केलीय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबतच्या भाषणात परराष्ट्र मंत्री महोदयांनी यावर भर दिला होता की, शेजारील देश आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत-चीन संबंधांना विविध पैलू आणि परिमाणे आहेत.
सीमेवरील तणाव कमी होत राहणे महत्त्वाचे : ते म्हणाले की, ”या संदर्भात प्रतिबंधात्मक व्यापारी उपाय आणि अडथळे टाळणे देखील महत्त्वाचे आहे. भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहेत. परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेच्या आधारावर संबंध हाताळल्यास हे शक्य आहे.” चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की, सीमेवरील तणाव कमी होत राहणे महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांनी अनेक आव्हाने पाहिली आहेत. आपले संबंध चांगले होऊ शकतात, परंतु दोन्ही देशांना एकत्र पुढे जावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्टला चीनमध्ये जाणार : दुसरीकडे जयशंकर म्हणाले की, ”सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धची लढाई ही आणखी एक प्रमुख प्राथमिकता आहे. मी दोन्ही देशांमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीची अपेक्षा करतो. आपल्या चर्चेमुळे भारत आणि चीनमधील स्थिर, सहकार्यात्मक आणि दूरदृष्टी असलेले संबंध निर्माण करण्यास हातभार लागेल, जे आमच्या हितांना पूरक ठरेल आणि आमच्या चिंता दूर करेल,” असंही त्यांनी सांगितलंय. वांग यी यांचा हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 31 ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या संभाव्य भेटीपूर्वी होत आहे.
