Spread the love

बारामती / महान कार्य वृत्तसेवा

नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी भाटघर, निरा देवघर आणि वीर धरणांतून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे निरा नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. मीरा नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

धरणातील पाणीसाठा 100 टक्के : पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (19 ऑगस्ट) सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 26 मिमी पाऊस नोंदला गेला असून, धरणातील एकूण साठा 23.502 टीएमसी म्हणजे 100 टक्के झाला आहे. धरणातून वीज निर्मितीसाठी गृहातून 1,614 क्युसेक तर जलवाहिनीद्वारे 10,500 क्युसेक अशा एकूण 12,114 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या 57 मिमी पावसामुळे साठा 11.478 टीएमसी म्हणजे 97.85 टक्के झाला असून, या धरणातून 6,800 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

गुंजवानी धरणात 85 मिमी पावसाची नोंद : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12 मिमी पाऊस झाला असून, साठा 8.968 टीएमसी म्हणजे 95.32 टक्के झाला आहे. येथून 1,800 क्युसेक पाणी निस्सारण कालव्याद्वारे तर 31,563 क्युसेक पाणी जलवाहिनीद्वारे असा एकूण 33,363 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच एनएलबीसीतून 775 आणि एनआरबीसीतून 749 क्युसेक पाणी सोडले जात आहे. गुंजवानी धरणात 85 मिमी पाऊस नोंदला गेला असून, साठा 2.997 टीएमसी म्हणजे 81.23 टक्के झाला आहे, मात्र येथून विसर्ग सुरू नाही. नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन : चारही धरणांमध्ये मिळून एकूण 3.646 टीएमसी इतका पाण्याचा नवीन ओघ आला असून, सध्याचा एकूण साठा 46.946 टीएमसी (97.14ज्ञ्) इतका आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 47.604 टीएमसी (98.50ज्ञ्) इतका होता. नीरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे, याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता संदीप भंडलकर यांनी दिलीय.