Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आणि अखंरड बरसणाऱ्या या पावसानं पुन्हा एकदा शहराची परीक्षाच पाहिली. यंत्रणांपासून प्रशासकीय विभागांपर्यंत सर्वांचीच या पावसानं दैना उडवली.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये परिस्थिती इतकी बिघडली की पाहता पाहता शहरातील अनेक सखल भागांमध्ये ‘परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन’ या नियमाप्रमाणंच पाणी साचलं. इतकंच नव्हे, तर शहरातील बहुतांश रेल्वे स्थानकांना ओढ्यांचं स्वरुप प्राप्त झालं, रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह इतका वाढला की अक्षरश: या पाण्यामुळं रस्त्यांनाच समुद्र आणि नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं, जिथं चक्क मुंबईकरांनी होड्यासुद्धा बाहेर काढल्या. अतिशयोक्ती नाही, मात्र सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले.

मीम्सना उधाण…

मुंबईत बरसणाऱ्या पावसानं यंत्रणांनीही संभाव्य धोका पाहता मंगळवारी सरकारी कार्यालयांसाठी रजा जाहीर केली, तर अनेक खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली. असं असलं तरीही तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत, पाणी साचलेल्या रेल्वे रुळांवरून वाट काढत मुंबईकर कर्मचारी नेमके कशा पद्धतीनं कार्यालयांवर पोहोचल आहेत त्यावर उपरोधिक आणि काहीसे विनोदी भाष्य करणारे मीम्ससुद्धा नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. तर, काहींनी ‘कर्मचाऱ्यांच्या मनातील आनंद… अर्थात न मागता मिळालेली सुट्टी’ अशा शब्दांत विनोदी भाष्य करणारं मीम शेअर केलं आहे.

दादर- हिंदमाता परिसरामध्ये दरवर्षी मुसळधार पावसात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मात्र यंदा ही परिस्थिती अधिकच बिकट असल्याचं पाहायला मिळत असून, पुन्हा एकदा ‘दादर- हिंदमाता रिसॉर्ट’मध्ये नागरिकांनी होड्या सोडल्याचं दृश्य दाखवणारा एक उपरोधिक व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईच्या गेट वे परिसरातूनसुद्धा एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं समुद्र प्रचंड खवळला असून संरक्षक भींतीला भेदून पाणी रस्त्यांवर येत असल्याचं दृश्य धडकी भरवून जात आहे. एकंदरच पावसानं मुंबईकरांची दैना उडवली असली तरीही नेटकऱ्यांच्या विनोदबुद्धीला मात्र याच पावसानं उधाण आलं आहे असं काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत असून, या अडचणीच्या वेळीसुद्धा हे मीम्स कळत नकळत पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतंय हे खरं.