मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, रस्ते वाहतूकीला देखील फटका बसला आहे. अनेक रेल्वे स्थानकात रेल्वे रूळांवर पाणी साचले आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे स्थानकांना ओढ्याचे स्वरुप आले आहे. विक्रोळी स्थानकात धबधब्याचे स्वरुप आले आहे.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला शीव, माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला, टिळक नगर, गोवंडी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने 20 ते 25 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम, माटुंगा रोड येथे पावसाचे पाणी भरल्याने लोकल कासव गतीने. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ईस्टर्न फ्री वे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
मुसळधार पावसामुळं अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन हा मुख्य रेल्वे स्थानक असून अनेक एक्सस्प्रेस या स्थानकात थांबतात. गाड्या उशिराने असल्याने रेल्वे प्रवासी ताटकळत उभे आहेत. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल 20-25 मिनिटे उशिराने
धावत आहेत. कालही सकाळ-संध्याकाळच्या गाड्या उशिराने धावल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. आज नियोजित वेळेवरती लोकल गाड्या येतील अशी अपेक्षा होती. मुंबईमध्ये मुसळधार व मात्र तांत्रिक अडचण आणि पावसामुळे आज सकाळपासून उशिरा सुरू असलेल्या या लोकल ट्रेनचा प्रवाशांना फटका बसला आहे. वेळेत लोकल न धावल्याने प्रवाशांमध्ये व सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमानांची एकच गैरसोय झाली होती. त्यामुळं कल्याण स्थानकावर तोबा गर्दी उसळली होती.
