मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या फॉर्मात आहे. मैदानाबाहेरही त्यांची नेतृत्वशैली, थेट आणि ठाम भूमिका घेण्याची तयारी, आणि एकदा निवडलेल्या खेळाडूंवर अढळ विश्वास ठेवण्याची सवय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषत: त्यांच्या ‘आवडत्या खेळाडूं’ना मिळणाऱ्या संधींवर सर्वांचे लक्ष आहे.
वरुण चक्रवर्तीला गंभीरने दिली संधी?
अशाच खेळाडूंपैकी एक म्हणजे फिरकीपटू वरुण चक्रवर्ती. एकेकाळी टी-20 विश्वचषकात सपशेल अपयशी ठरल्यावर वरुणचा संघातून पत्ता कट झाला होता. मात्र गंभीर जेव्हा केकेआरचा मेंटॉर बनला आणि नंतर टीम इंडियाचा कोच तेव्हा वरुणसाठी दुसरी संधी पुन्हा निर्माण झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान वरुणला अंतिम क्षणी संघात स्थान दिलं गेलं आणि त्यानेही त्या विश्वासाचं सोनं केलं. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला तंबूत पाठवत त्याने निर्णायक विकेट घेतली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
काय म्हणाला वरूण?
रेव्हस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत वरुणने गौतम गंभीरबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो, ”गौतीभाईंनी मला पुनरागमनाची संधी दिली. जेंव्हा सगळे मला विसरत होते, तेंव्हा ते मला सांगायचे ‘कोणीही तुला दुर्लक्ष केलं तरी मी तुला माझ्या प्लॅनमध्ये ठेवीन.”’ वरुणच्या मते गंभीर फक्त प्लॅनिंगमध्ये नाही, तर ड्रेसिंग रूममध्येही योद्ध्याची मानसिकता घेऊन येतो. त्यामुळे खेळाडूंमध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि तीच ऊर्जा केकेआरच्या तिसऱ्या आयपीएल विजयानंतर आता टीम इंडियामध्येही दिसत आहे.
गंभीरने प्रशिक्षक म्हणून आपल्या आवडत्या खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांच्यातील क्षमतेला वाव दिला आहे आणि वरुण चक्रवर्ती हे त्याचं उत्तम उदाहरण ठरत आहे.
