मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईमध्ये पावसाने जोर धरला असून पहाटेपासूनच देशाच्या आर्थिक राजधानीला पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळपासून मुंबईला सूर्याचंही दर्शन झालेलं नसून जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. असं असतानाच आता मुंबईतून वाहणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे भांडूप आणि विक्रोळीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
मिठीने धोक्याची पातळी ओलांडली
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मिठी नदीतील पाणी पातळीने चार पूर्णांक सात मीटर इतका स्तर गाठला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या वसाहतीमध्ये स्पीकर लावून नागरिकांना सतर्क केले आहे.
ट्रेन अनब रस्ते वाहतुकीला फटका
पावसामुळे लोकल ट्रेन्सबरोबरच रस्ते वाहतूक धीम्या गतीने होत आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला शीव, माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला, टिळक नगर, गोवंडी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने 20 ते 25 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम, माटुंगा रोड येथे पाऊसाचे पाणी भरल्याने लोकल कासव गतीने. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ईस्टर्न फ्री वे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
चौपट्या बंद
पावसाचा वाढता जोर लक्षात घेत मुंबईतील सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. चौपाट्यांवर सामान्य लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, गोराई बीच हे सर्व ठिकाणे रिकामी करण्यात आली आहेत. मरीन ड्राइव्ह, वरळी सी फेस, वांद्रे कार्टर रोड, मध आयलंड यासारख्या समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उंच भरती आणि मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.
आजच्या भरतीच्या वेळा
कमी भरती
1:58 अशब (मंगळवार, 19 ऑगस्ट)
1.01 मी (3.31 फूट)
उच्च भरती
सकाळी 9.17 (मंगळवार, 19 ऑगस्ट)
3.74 मी (12.27 फूट)
कमी भरती
दुपारी 3.29 (मंगळवार, 19 ऑगस्ट)
2.2 मी (7.22 फूट)
उच्च भरती
रात्री 8.36 (मंगळवार, 19 ऑगस्ट)
3.16 मी (10.37 फूट)
मुंबईत सर्वाधिक पाऊस कुठे पडला?
मुंबईत आज 19 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत (4 तास) सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे खालीलप्रमाणे:
(पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)
पश्चिम उपनगरे
1) चिंचोली अग्निशमन केंद्र – 107
2) वर्सोवा उदंचन केंद्र – 106
3) दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा – 98
4) सुपारी टँक महानगरपालिका शाळा, वांद्रे – 95
5) कांदिवली अग्निशमन केंद्र – 92
शहर
1) फॉर्सबेरी जलाशय, एफ दक्षिण कार्यालय – 109
2) पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर – 103
3) बी नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा – 99
4) नायर रूग्णालय – 94
5) सीआयडीएम, परळ – 89
पूर्व उपनगरे
1) मुलुंड अग्निशमन केंद्र – 100
2) गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र – 95
3) विना नगर महानगरपालिका शाळा – 93
4) चेंबूर अग्निशमन केंद्र – 90 5) इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी – 87
