Spread the love

कोलकाता / महान कार्य वृत्तसेवा

एखादं पदक जिंकणं सुद्धा किती कठीण असतं हे आयुष्यात कोणतंही पदक जिंकणारी व्यक्ती सांगू शकते. मात्र कष्टाने कमवलेली ही संपत्ती चोरीला गेली तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार भारतामधील एका महिला खेळाडूसोबत घडला असून तिच्या घरातून 120 गोल्ड मेडल्स चोरीला गेली आहेत. तसेच तिच्या घरातील पद्मश्री पदकाची प्रतिकृतीही चोरली गेली आहे.

कोण आहे ही खेळाडू?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी माजी राष्ट्रीय जलतरण विजेती बुला चौधरी यांच्या घरावर दरोडा पडला. हुगळी येथील बुला चौधरी यांच्या घरातून चोरट्यांनी पदकं चोरुन नेली. गेल्या दशकात दुसऱ्यांदा या जलतरणपटूच्या घरावर दरोडा पडला असून आता पडलेल्या दरोड्यामध्ये तिने जिंकलेली सुमारे 120 सुवर्णपदके आणि पद्मश्री पदकाची प्रतिकृती चोरली गेली आहे.

चोरीची माहिती कशी कळाली?

दक्षिण कोलकाता येथे राहणाऱ्या चौधरी यांनी, ”पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील हिंदमोटर येथील एका शेजाऱ्याने मला घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी माझ्या घराच्या एका दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिल्यानंतर आम्हाला याबद्दल कळवलं,” अशी माहिती रडत रडतच दिली. ही माहिती मिळताच बुला चौधरी आणि त्यांचे कुटुंब हुगळीमध्ये दाखल झाले. बुला यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

150 पदकं चोरीला

”मी माझ्या आयुष्यात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकलेल्या 120 सुवर्णपदकांसह 150 हून अधिक पदके या चोरीत गमावली आहेत. या यादीत मी एसएएफ गेम्समध्ये जिंकलेल्या 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे,” असं बुला चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले आहे. दक्षिण आशियाई खेळांना पूर्वी दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स किंवा एसएएफ गेम्स म्हणून ओळखले जात असे. ”घरात ठेवलेले अर्जुन पुरस्कार आणि तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी क्रीडा पुरस्कार अजूनही तिथेच आहेत. ते चोरीला गेलेले नाहीत,” असंही बुला चौधरी यांनी सांगितलं आहे.

कधी मिळालेला पद्मश्री?

मूळ पदकासह प्राप्तकर्त्यांना देण्यात येणाऱ्या पद्मश्री पदकाची प्रतिकृती देखील चोरीला गेली, असे बुला चौधरी यांनी सांगितलं. बुला चौधरी यांना 2008 साली देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

आधीही पडलेला दरोडा

2015 साली मार्च महिन्याध्येही चौधरी यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकलेला. या चोरीनंतर स्थानिक पोलिसांनी घराबाहेर रक्षक तैनात केले होते परंतु 2021 मध्ये कोविड साथीच्या काळात ते काढून घेण्यात आले. ती आणि तिचे कुटुंब दर दोन ते तीन महिन्यांनी घरी येत होते. उत्तरपारा पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाबद्दल बोलताना, ”आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे,” असं सांगितले.

आमदारही झाल्या

2006 मध्ये चौधरी यांनी सीपीएमच्या तिकिटावर नंदनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी 2011 पर्यंत पश्चिम बंगाल विधानसभेत या जागेचे प्रतिनिधित्व केले.