Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक योजना बंद पडत आहेत. अशावेळी महाराष्ट्रातील अनेक मंत्री राज्य वाऱ्यावर सोडून लंडनला गेले आहेत. कार्यक्रम खासगी असेल किंवा सरकारी असेल. पण महाराष्ट्र भुका-कंगाल असताना मंत्री परदेशात गेले आहेत, ही चिंतेची बाब असल्याची टीका शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतांनी केलीय, ते आज नवी दिल्लीत बोलत होते.

निवडणूक आयुक्तांकडून भाजपाची वकिली : केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना आठ दिवसांत शपथपत्र सादर करा किंवा माफी मागा, असं आवाहन केलंय. त्याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, ”हा ॲरोगन्स, मग्रुरी आहे. निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशी मग्रुरी अपेक्षित नाही. असा ॲरोगन्स भाजपाच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे आणि निवडणूक आयुक्त त्याप्रमाणे वागले आहेत. ते राहुल गांधींकडे शपथपत्र मागताहेत. पण या देशातील 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील तसाच आरोप केला आहे, असंही ते म्हणालेत.

त्यांच्याकडे ॲफिडेव्हिट मागायची हिंमत आहे का? : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ज्या पक्षाची वकिली करताहेत, त्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यानं राहुल गांधींप्रमाणं आरोप केले आहेत. मग त्यांच्याकडे ॲफिडेव्हिट मागायची हिंमत आहे का? वायनाडमध्ये मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याची कबुली स्वत: एक केंद्रीय मंत्री देतोय. त्यामुळं सर्वात आधी निवडणूक आयोगानं केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र मागायला हवं. राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले, त्यातील एकाही प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही”, असं देखील राऊत म्हणाले.

मतचोरीचा मुद्दा अतिशय गंभीर : ”उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याबाबत आज इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आले असता, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंसोबत या विषयावर चर्चा झाली होती. देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपेक्षाही गंभीर मुद्दे आहेत. मतचोरीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. आम्ही त्यावरून ध्यान हटवू इच्छित नाही. आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी बहुमत नसल्यामुळे मुख्य मुद्द्‌‍यांवरचं लक्ष हटता कामा नये, असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे”, असंही राऊत म्हणालेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती होत असल्यास आनंदच : संजय राऊत म्हणाले की, सी. पी. राधाकृष्णन हे मागील एका वर्षापासून राज्यपाल म्हणून महाराष्ट्राची कमान सांभाळत होते. अतिशय संतुलित व्यक्तिमत्व, सर्वांना न्याय देण्याची भावना त्यांच्याकडं होती. तामिळनाडूमध्ये भाजपा वाढवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं आहे. पार्टीबाहेरचा उमेदवार न देता मूळ केडरमधल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. महाराष्ट्राचे राज्यपाल जर उपराष्ट्रपती होत असतील, तर आम्हाला आनंदच आहे, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय.