पुणे / महान कार्य वृत्तसेवा
अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे ट्रक आणि टँकर यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील आई मुलगा आणि नातू अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 38 वर्षीय ज्ञानेश्वर मकाजी वाजे, 68 वर्षीय शांताबाई मकाजी वाजे आणि त्यांचा 5 वर्षीय मुलगा युवांश यांचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर मकाजी वाजे हे आई व लहान मुलांसह मुंबईून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून आपल्या गावी जात होते. पहाटेच्या सुमारास काळूबाई नगर येथील बंटी ढाब्याजवळ दुध टँकर हा मालवाहू टॅकला धडकला. ही धडक इतकी भीषण होती ही टँकर थेट ट्रकमध्येच घुसला. अपघातानंतर जखमींना टँकरमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र चिमुरडा युवांश याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वडनेर गावात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दूध वाहतूक करणारा टँकर ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाल्याचे समोर येतेय. टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
