बीड / महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून, माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आला आहे. पूर परिस्थितीमुळे सिमरी पारगाव, उबरी बु., जीवनापूर, मोगरा, डाके पिंपरी, आनंदगाव, साळेगाव, कोथाळा ते पोहणेर या गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. माजलगाव ते मोगरा रस्ताही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच, खडकी नदीवरील पूल वाहून गेला असून या भागातील संपर्क तुटला आहे.
शेतीचंही प्रचंड नुकसान : सोबतच, या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक शेतांमध्ये तलावाचं स्वरूप आलं असून, विशेषत: कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागांमध्ये कपाशी पिकांनी अचानक माना टाकल्या असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाचा शहरातील व्यापाऱ्यांना फटका :
माजलगाव शहरातील प्रमुख खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 548 सी चे काम पूर्ण होऊन आतापर्यंत 10 वर्षे उलटली आहेत. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गाच्या नाल्यांच्या डिझाइनमुळे वाहतुकीस मोठा त्रास होत आहे. शहरातील नाल्यांचं काम रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करणे आवश्यक असताना, नाली रस्त्याच्या मधोमध करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडला आहे. शिवाय, संबंधित गुत्तेदारानं नाल्याच्या वर रस्ता बनवल्यानं रस्ता खाली बसला आहे. या कारणामुळे थोडासा जरी पाऊस पडला तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचतात. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणं मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतं. अशा स्थिती व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो. या गंभीर समस्येबाबत लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि विरोधक पक्ष यांचे कोणतेही स्पष्ट पाऊल उचललेले नाही, त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांत मोठा रोष व्यक्त केला जात आहे.
