Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगरासाठी (मुंबई शहर व उपनगरे) 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं दुपारी 12 वाजल्यानंतर होणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागानं बृहन्मुंबई क्षेत्रात आज (18 ऑगस्ट 2025) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजल्यानंतर भरणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आपत्कालीन समितीसह सर्व विभागांची बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला. मुंबईतील सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.

खबरदारी म्हणून सकाळी काही शाळा बंद- सकाळच्या सत्रातील शाळांना सूचना दिली गेली नसली तरी अनेक शाळांनी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवल्या होत्या. तसेच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका प्रशासनानं आपत्कालीन परिस्थिती दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून युद्धपातळीवर शाळांच्या सुट्ट्‌‍यांबाबत निर्णय कळवले पाहिजेत,असा सूर शिक्षक आणि पालकांमधून उमटला आहे.

सूचनांचं पालन करून सहकार्य करावं- सर्व नागरिकांना आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे, असा महापालिकेनं आवाहन केलं आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं, असे महापालिकेनं म्हटलं आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1996 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधण्याचं महापालिकेनं आवाहन केलं आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं आणि सकाळपासून सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई विमानतळावरुन श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणताना काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे, ही माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत आहे.

नियोजन करुनच बाहेर पडा- मुंबई पोलीस आयुक्तांनीदेखील नागरिकांना प्रवासासाठी काळजीपूर्वक नियोजन करुनच बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आपली सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आपत्कालीन प्रसंगी 100 / 112 /103 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा, असे मुंबई पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियातून आवाहन केलं आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना – राज्यात पुढील 24 तासांसाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान समुद्राची खवळलेली स्थिती आणि ताशी 50-60 किमी वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.