मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
पश्चिम घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय. धरणात प्रति सेकंद 40 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व लघु मध्यम प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आलं आहे.
साडेतीन टीएमसी पाण्याची आवक : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. धरणात प्रति सेकंद 40 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे 24 तासांत कोयना धरणात तब्बल साडे तीन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा 96 टीएमसी झाला आहे. पावसाचे अजून बरेच दिवस बाकी असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात 385 मिलीमीटर पाऊस : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 113 मिलीमीटर, नवजा येथे 151 आणि महाबळेश्वर येथे 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तब्बल 385 मिलीमीटर पावसामुळे कोयना धरणात 3.35 टीएमसी पाण्याची आवक झाली. सकाळी 8 पर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 95.58 टीएमसी झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि सांडव्यावरून 12,100 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे.
18 ते 19 ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाची शक्यता : विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.
