नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भाजपानं महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं कौतुक केलं आहे. ते राजधानीत माध्यमांशी बोलत होते.
जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) रविवारी 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केलं. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
एनडीएकडून राधाकृष्णनं हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार आहेत. त्याबाबत खासदार राऊत म्हणाले, ”सी. पी. राधाकृष्णन हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. ते कोणत्याही वादात नाहीत. त्यांना भरपूर अनुभव आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.”
संवैधानिक पदाच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात- ”राज्याच्या राज्यपालांना राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची संधी मिळत असल्यानं आनंद आहे. जे. पी. नड्डा यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्याबाबत इंडिया आघाडी सहमतीनं निर्णय घेईल. उद्धव ठाकरे यांनी आपलं मत राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडं माडलं आहे. संवैधानिक पदाच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात”, असे आम्हाला वाटते.
त्यांच्याकडं प्रतिज्ञापत्र मागण्याची हिंमत आहे का- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत मतचोरी होत असल्याचा आरोप करत भाजपासह निवडणूक आयोगावर सातत्यानं टीका केली आहे. त्यावर निवडणूक आयोगानं रविवारी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रावर आरोप करावेत, अन्यथा देशाची माफी मागावी अशी भूमिका निवडणूक आयोगानं स्पष्ट केली आहे. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, ” राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र मागणं ही निवडणूक आयोगाची मग्रुरी आहे. मत चोरीच्या मुद्द्यावरच लक्ष हटू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. राहुल गांधींप्रमाणेच अनुराग ठाकूर यांनी निवडणूक आयोगाकडं मागणी केली. त्यांच्याकडं प्रतिज्ञापत्र मागण्याची निवडणूक आयोगाकडं हिंमत आहे का”, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
कोण आहेत राधाकृष्णन? राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. हे पद त्यांनी 31 जुलै 2024 रोजी स्वीकारले. यापूर्वी, त्यांनी फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं. मार्च 2024 ते जुलै 2024 दरम्यान त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनदेखील अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्णन हे कोइम्बतूर येथून दोनदा लोकसभेवर निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं.
