मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राजधानी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. आज पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज मुंबईत पाऊस जोरदार झाल्यानं त्याचा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील वडाळा, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळकनगर या भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहेत.
मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळं मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाचा जोर वाढल्यास लोकल सेवेवर अधिक फरक पडू शकतो, अशी माहिती आहे. सध्या हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे अशी माहिती आहे.
रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने अतिशय धीम्या गतीने लोकल वाहतूक सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी धोका आहे, पाणी साचले आहे त्या त्या ठिकाणी मध्य रेल्वेने कर्मचारी उभे केले आहेत. लोकलची वाहतूक सुरक्षितरित्या सुरू रहावी यासाठी हे कर्मचारी उभे करण्यात आले आहेत.
वडाळा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वडाळा येथे रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिरानं सुरु आहे.
दुसरीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरु असून वाहतुकीवर कुठेही मोठा प्रभाव नसल्याचं पाहायला मिळतं.
मुंबईतील किंग्ज सर्कल भागात गुडघाभर पाणी साठल्याचं पाहायला मिळालं. वाहनधारकांनी रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून वाट काढत जाण्याचा प्रयत्न केला. काही वाहनधारकांच्या गाड्या बंद पडल्याचं देखील पाहायला मिळालं.
मुंबईसाठी रेड अलर्ट भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी (मुंबई शहर व उपनगरे) दिनांक 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
