कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा
समाजातील महिलांनी अडचणींवर मात करून केलेले कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. अशा सन्मान सोहळ्यांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. असे प्रतिपादन उद्योगपती राहुल खंजिरे यांनी केले. समाजवादी प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
फिनिक्स फाउंडेशनतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा तसेच इतर क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिलेल्या श्रावणी जाधव, वैशाली हावळे, शुभांगी शिंत्रे, स्नेहल घोरपडे, सुनिता धुमाळे, उर्मिला खोत या महिलांचा सन्मान करून त्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान त्यांना आणखी समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जीवन पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, महिला सन्मान सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व लेखक कृष्णात कोरवी व मराठी विभाग प्रमुख संतोष पाटील घोडावत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, अतिग्रे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता बिरनाळे यांनी केले. आभार पशारदा पाटील यांनी मानले.
