सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती
इचलकरंजी सुभाष भस्मे/महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आर या पार लढाईची घोषणा केली आहे. या लढाईत सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून २५ हजाराहुन अधिक मराठा बांधव २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळकाढुपणा केला आहे. मागच्यावेळी मुंबईकडे जाणारे मराठ्यांचे वादळ रोखून सरकारने फसवा आदेश देऊन फसवणुक केली. त्यामुळे २९ ऑगस्टची ही लढाई अंतिम असेल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनासाठी मुंबईकडे तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या घरातील एक व्यक्ती सहभागी होईल यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात बैठका, सोशलमिडीयाचा प्रभावी वापर आणि प्रसारमाध्यमांद्वारे मराठा बांधवांना आवाहन करण्यात येत असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले. भविष्यात आपल्या पिढीसाठी या आंदोलनात मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे यावेळी सांगितले. यावेळी शिवाजी पाटील, कृष्णात बाणदार, मिलींद पाटील, संतोेष सावंत, शहाजी भोसले, प्रथमेश माने, शाम यादव, शरद पाटील, रमेश घोरपडे, अभिजीत घोरपडे, प्रशांत निकम, दिपक पाटील, सुभाष चव्हाण, राजेंद्र वाडकर, सागर चव्हाण, सुशांत पोळ, सुनिल दळवे, संदीप पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.
