इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल नाईक यांना हिंदुस्तानी प्रचार सभा मुंबई यांच्या वतीने अहिंदी भाषा प्रदेशामध्ये संशोधन व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल *महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान* प्राप्त झालेला आहे.
संपूर्ण भारतामधून काही निवडक व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली होती. हिंदी भाषा,हिंदी साहित्य आणि हिंदी शिक्षा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र,गोवा कोईमतुर, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथील हिंदी भाषेवरती प्रेम करणारे सन्माननीय उपस्थित होते.
हिंदुस्तानी प्रचार सभेचे माननीय डॉ. नीता कुमारी, माननीय श्री राकेश कुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ.विठ्ठल नाईक हे गेली वीस वर्षाहून अधिक काळ हिंदी साहित्य आणि शिक्षा क्षेत्रामध्ये आपले अतुलनीय योगदान देत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे पीएचडी चे मार्गदर्शक म्हणूनही काम करत आहेत.आजपर्यंत असंख्य कार्यशाळांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे.
त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली आहे. मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालय आणि संस्था स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
