इचलकरंजी सुभाष भस्मे/महान कार्य वृत्तसेवा
येथील श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व श्री वरद विनायक बोट क्लब यांच्या वतीने आयोजित भव्य होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरूण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळवीला. तर सांगलवाडीच्याच रॉयल कृष्णा बोट क्लबने द्वितीय, डिग्रजच्या डिग्रज बोट क्लब अ ने तृतीय आणि इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबने चतुर्थ क्रमांक मिळिवला.
दरवर्षीप्रमाणे श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने पंचगंगा नदी पात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ११ क्लबचा सहभाग होता. शर्यतींचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शर्यतीचा आनंद घेण्यासाठी जलक्रीडाप्रेमींनी नदीतीरावर मोठी गर्दी केली होती. सर्वच स्पर्धकांना नागरिकांकडून प्रोत्साहन दिले जात होते.
शर्यत संपल्यानंतर निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकास रोख २१ हजार व शिल्ड, द्वितीय क्रमांकास १५ हजार व शिल्ड, तृतीय क्रमांकास ११ हजार व शिल्ड तर चौथ्या क्रमांकास ७ हजार व शिल्ड असे बक्षिसे देण्यात आली. यावेळी श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे, द्वारकाधीश सारडा, तानाजी पोवार, बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, के. व्ही. पालनकर, उदय बुगड, युवराज माळी, सुनिल तोडकर, संग्राम स्वामी, प्रमोद बचाटे, धनराज खंडेलवाल, श्रीकांत कगुडे, विष्णुपंत शिंदे, शशिकांत नेजे, डॉ. विजय माळी, गणेश बरगाले, राहुल जानवेकर आदी उपस्थित होते.
