इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विवेक कुंभार)
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीच्या भावना स्वरांमध्ये गुंफून एक सुरेल सोहळा रंगणार आहे. स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी ‘देश रंगीला रंगीला’ या शीर्षकाने देशभक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, अकॅडमीतील विद्यार्थी गायन, सामूहिक तबला वादन आणि इलेक्ट्रीक बेन्जोच्या साथीनं रसिकांच्या मनात देशप्रेमाचे सूर झंकारणार आहेत.
संगीत, लय आणि तालाच्या संगमाने सजणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉ. विक्रम शिंगाडे, ॲड.प्रिती हट्टीमनी, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष आशिष खंडेलवाल तसेच संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची असणार आहे. दिवसभर रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ६ वाजता होणार असून त्यासाठी ‘ग्रामदेवता’चे संपादक सखाराम जाधव, ‘सत्यमुख 24’ चे संपादक रमेशभाई पंडयाजी आणि अकॅडमीचे हितचिंतक आशिष खंडेलवाल उपस्थित असणार आहेत.
गेली सात वर्षे शास्त्रीय, सुगम संगीत व कराओकेच्या प्रशिक्षणाची अखंड सेवा देणाऱ्या स्वरतरंग संगीत अकॅडमीने ७७ विद्यार्थ्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार तयार केले आहे. आतापर्यंत शंभर टक्के निकालाचा विक्रम, पाच राज्यस्तरीय पुरस्कार आणि कोरे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली ७८ राज्यस्तरीय व पाच राष्ट्रीय सन्मान हा या संस्थेचा अभिमान आहे.
वर्षभरात २२ ते २५ सांगितिक कार्यक्रम, कलाकारांचा वाढदिवस, जयंती आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करून अकॅडमी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रंगमंचाचा अनुभव देते. उपाध्यक्ष निखिल भंडारे, प्रा.वैभव माळी, खजिनदार डॉ.शुभांगी कोरे, संचालक ऋतुराज कोरे व संचालिका सेवभक्ती माळी यांच्या अथक प्रयत्नांनी आज हजारो विद्यार्थी घडले असून, अनेक कलाकार आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचले आहेत.
बक्षीस वितरण सोहळ्यात पैलवान अमृत मामा भोसले, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, डॉ. मुंकुद बडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, देशभक्तीच्या स्वरलहरींनी इचलकरंजीच्या संगीतविश्वात देशप्रेमाचा दरवळ पसरवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून पूर्ण होणार आहे.
