४३ लाखांहून अधिक उत्पन्न : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
नारळीपौर्णिमा (शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५) व रक्षाबंधन (शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५) या सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच अंगारकी संकष्टी (मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५) निमित्त श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी इचलकरंजी आगारतर्फे जादा बससेवेचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, मिरज, नृसिंहवाडी, पेठवडगाव, निपाणी, पुणे व सोलापूर या प्रमुख मार्गांवर तसेच गणपतीपुळे मार्गावर ही विशेष वाहतूक चालवण्यात आली.
या जादा बससेवेला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त एकूण ६५,१७८ किमी वाहतूक करून रु. ४२,६६,००० इतके उत्पन्न झाले. प्रति किलोमीटर उत्पन्न ६५.४५ रुपये तर प्रति किलोमीटर व्युत्पन्न ९०.७३ रुपये इतके राहिले. या कालावधीत ७८,५८२ प्रवाशांनी प्रवास केला.
अंगारकी संकष्टी निमित्त गणपतीपुळे मार्गावर ७९२ किमी वाहतूक करण्यात येऊन रु. ५६,००० उत्पन्न झाले. प्रति किलोमीटर उत्पन्न ७०.६३ रुपये व व्युत्पन्न ९९.२८ रुपये इतके तर प्रवासी संख्या २६४ इतकी होती.
एकूण मिळून ६५,९७० किमी वाहतूक करून इचलकरंजी आगारास रु. ४३,२२,००० उत्पन्न झाले. सरासरी प्रति किमी उत्पन्न ६५.५१ रुपये व व्युत्पन्न ९०.८१ रुपये राहिले. एकूण ७८,८४६ प्रवाशांनी या जादा बससेवांचा लाभ घेतला.
प्रवासी बंधू-भगिनींनी या सोयीचा उत्साहाने लाभ घेतल्याने व बसेसची चांगली सोय झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळेच हे यश शक्य झाल्याचे आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले.
