Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)

यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मथुरा हायस्कूल येथे सकाळी आयोजित करण्यात येणार असून, गेल्या वीस वर्षांपासून अखंडित सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम यावर्षीही कायम ठेवण्यात आला आहे.

रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदुराव शेळके चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून, या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होण्यास मदत होते. स्वातंत्र्य दिन आणि समाजहित यांचा संगम साधत या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने विवेक शेळके यांनी केले आहे.

या शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, रक्त संकलनासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षिततेच्या सर्व बाबींची काळजी घेण्यात येणार आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे इचलकरंजी शहरात रक्तदान चळवळीला चालना मिळाली आहे. शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.