प्रिंटर, लॅपटॉप, मोबाइलसह तिघे अटक : 2 लाख 24 हजार किमतीच्या बनावट नोटा व साहित्य जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर ची कारवाई
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने इचलकरंजीतील तिघा तरुणांना अटक केली आहे. अनिकेत विजय शिंदे (वय २४ रा. पंत मंदिर समोर मंगळवार पेठ), राज रमेश सनदी (वय १९ रा. भुईनगर शहापूर) आणि सोएब अमजद कलावंत (वय १९ रा. परीट गल्ली गावभाग) अशी त्यांची नांवे आहेत. या कारवाईत त्यांच्याकडून २ लाख २४ हजाराच्या बनावट नोटा आणि ७० हजार ७०० रुपयांचे इतर साहित्य असा २ लाख ९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनविण्यास सुरुवात केली तसेच त्या कुठे वापरल्या, अन्य साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बाजारात बनावट नोटा खपविण्याचे प्रमाण वाढले असलेने नोटा छपाईत सक्रीय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले होते. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार संतोष बरगे व प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला. त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या. अधिक चौकशी करता त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचे सांगितले. त्यामध्ये राज सनदी व सोएब कलावंत हे मदत करत असल्याचे व ते घरात असल्याचे सांगितले. त्यावरून मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिरासमोरील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला. त्यावेळी कलावंत व सनदी हे मिळून आले. तसेच घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले. पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतले.
या कारवाईत ५०० रुपयांचा ३९२ आणि १०० रुपयांच्या २८२ अशा २ लाख २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्याचबरोबर प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, दोन मोबाईल व इतर साहित्य असा ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांवर गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, उपनिरिक्षक संतोष गळवे, पोलिस अंमलदार संतोष बरगे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांच्या पथकाने केली.
