Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

कबुतरखाना बंदीवरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दादरमधील कबुतरखाना बंद केला. त्यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. कबुतरखान्याच्या वादावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना चांगलंच सुनावले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी मुंबईतील शाखा अध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

मांसाहार बंदीवर काय म्हणाले?

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्वातंत्र्य दिनी मांसाहार बंदी घातली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, माझ्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिनी मांसविक्री सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्वातंत्र्य दिनी काय खायचे काय नाही खायचे यांची बंदी महापालिका नाही घालू शकत नाही, असेही राज यांनी म्हटले. स्वातंत्र्यदिनी कश्यावरही बंदी घालणे हा निव्वळ विरोधाभास असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी कबुतरखान्याच्या बंदीवर भाष्य केले. राज यांनी म्हटले की, आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी कबुतरांमुळे होर्णाया आजारांबाबत सांगितले आहे. हायकोर्टानेदेखील कबुतरखान्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सुनावले. लोढा यांनी लक्षात ठेवावे की ते एका समाजाचे मंत्री नाहीत त्यांनी न्यायालयाचा मान राखावा. त्यांनी दिलेल्या निर्णायाचे पालन करावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

कबुतरखान्यावरील बंदी ही जैन मुनींनी समजून घेतली पाहिजे.  त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करूनही जे कबुतरांना खायला देत असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही राज यांनी स्पष्टच म्हटले.

राज यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, कबुतरखान्यावर गोंधळ घालणाऱ्या जैन आंदोलकांवर कारवाई झाली पाहिजे, ती झाली नाही. या सरकारने आधी हिंदीचा मुद्दा आणला. त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता कबुतरं आणली आहे. नेमकं या सरकारला काय हवयं, असा सवाल राज यांनी केला.