पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांचा इशारा
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत अवैध धंद्याचा बिमोड आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सर्वोतपरी कारवाई केली जाईल. विशेषत: येणार्या गणेशोत्सवाच्या काळात गेल्या ५ वर्षात ज्या गुन्हेगारांवर मोका कारवाई झाल्या त्या सर्वांना हद्दपार करण्यात येईल. त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना देखील हद्दपारीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
इचलकरंजी ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी विक्रांत गायकवाड हे नुकतेच रुजु झाले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, इचलकरंजी शहर आणि उपविभागात येणार्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. सण, समारंभ, निवडणुक या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत यापूर्वी कारवाई झालेल्या आहेत. आणखीनही मोठ्या कारवाया नजीकच्या काळात झालेल्या दिसतील. केवळ नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारे यांच्यापर्यंत न जाता त्याची पाळेमुळे शोधण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत. शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवतातान महिलांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देत विविध शाळा, महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करणार आहोत. नागरीकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री गायकवाड यांनी केले.
