इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सागर बाणदार)
काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी इचलकरंजी शहर परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कुंभार कारागिरांसह गणेशमूर्ती ,सजावट व पुजेचे साहित्य विक्री करणा-या व्यावसायिकांची मोठी लगबग वाढली आहे.या पार्श्वभूमीवर विविध स्टाॅलने बाजारपेठ सजली असून सार्वजनिक मंडळांसह सर्वांचीच जय्यत तयारी सुरु झाली आहे.दरम्यान , गणेशमूर्ती व हालते देखाव्याच्या मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर ,प्रायमर ,रंग या कच्चा मालाच्या दरात व इतर खर्चात वाढ झाल्याने साहजिकच गणेशमूर्तींच्या दरामध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाल्याचे कुंभार कारागिर मिथुन ठाणेकर यांनी महान कार्यशी बोलताना सांगितले.
इचलकरंजी शहराच्या गणेशोत्सवाला मोठी धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.त्याच जोडीला प्रबोधनात्मक सजीव तसेच मुर्तींचे हालते देखावे हे नेहमीच नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.याला सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या इचलकरंजी फेस्टीवलची जोड मिळत असल्याने गणेशोत्सव सण हा सर्वांचीच उत्सुकता वाढवणारा आहे.यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर कुंभार कारागिरांनी मागील मे महिन्यापासून गणेशमूर्ती व देखावे मूर्तीच्या कामाला वेग दिला असल्याचे इचलकरंजी शहरातील कलानगर कुंभार गल्ली, विक्रमनगर, लायकर मळा, कोकरे मळा, शहापूर यासह विविध ठिकाणी सुरु असलेल्या मूर्ती कामाच्या लगबगीतून पहायला मिळाले. त्यात यंदाचा वर्षी न्यायालयाने काही निर्बंध घालून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर गणेशमूर्तीं वरील बंदीमुळे आर्थिक आरिष्टात सापडलेल्या कुंभार कारागिरांना मोठा. दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गणेशमूर्तीं व हलते देखावे मूर्तीच्या कामालाही मोठा जोर लागला आहे. सद्यस्थितीत ८० टक्के गणेशमूर्तींचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २० टक्के कामासाठी कुंभार कारागिर राञीचा दिवस करत आहेत. त्यांचे अख्खे कुटूंबच या कामात व्यस्त असून ९० टक्के गणेशमूर्तींचे बुकींग झाले आहे. आकर्षक व विविध रुपातील गणेशमूर्तीं बुकींग करण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा दरवर्षीसारखा यंदाच्या वर्षीही विशेष कल दिसत आहे. घरगुती गणेशमूर्ती बुकींगसाठी देखील हीच परिस्थिती दिसत आहे. यंदाच्या वर्षी घरगुती गणेशमूर्तींचे दर अगदी ८०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत आणि मोठ्या आकारातील गणेशमूर्तींचे दर अगदी १५ हजार रुपयांपासून ते ३ लाखांपर्यंत असल्याचे ठाणेकर आर्टसचे मिथुन ठाणेकर यांनी सांगितले. तसेच कच्चा मालाचे वाढते दर, कामगारांचा पगार, वीज बील, वाहतूक खर्च व इतर उत्पादन खर्च याचा आर्थिक ताळमेळ बसत नाही. त्यामुळे साहजिकच गणेशमूर्तींच्या दरामध्ये ४० टक्के वाढ झाली असून भाविकांसह सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्ती दरामध्ये अधिक घासाघीस न करता कुंभार कारागिर व व्यापा-यांना सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले. एकंदरीत, गणेशमूर्ती व देखावे मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच विविध स्टाॅलने बाजारपेठ सजली असून सार्वजनिक मंडळांसह सर्वांचीच जय्यत तयारी सुरु झाली आहे.
