Spread the love

गाजा / महान कार्य वृत्तसेवा

इस्रायलने गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्‌‍यात अल-जझीरा अरेबिकचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर पत्रकार ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. कतार येथील माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. हा हवाई हल्ला अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी राहत होते.

अल-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तंबूला लक्ष्य करत झालेल्या हल्ल्‌‍यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिफा हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने दिली.

इस्रायलच्या लष्कराने अल शरीफ हा हवाई हल्ल्‌‍यात ठार झाल्याचे म्हटले आहे, तसेच त्याच्यावर इस्रायली लष्कर आणि सामान्य नागरिकांवर रॉकेट हल्ले घडवून आणणाऱ्या हमासचा दहशतवादी सेल चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

”अनस अल शरीफ हा हमास या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी सेलचा प्रमुख होता आणि इस्रायली नागरिक आणि आडीएफ सैन्याविरोधात रॉकेट हल्ले घडवू आणण्यात त्याचा सहभाग होता,” असे इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.

अल जझीराने इस्रायलने केलेल्या याच एअर स्ट्राइकमध्ये करस्पॉन्डट मोहम्मद क्रेइकेह (ैीांग्ािंप्), कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम झहेर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलिवा तसेच त्यांचा असिस्टंट मोहम्मद नौफल यांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

इस्रायलच्या हल्ल्‌‍यात मृत्यू होण्यापूर्वी अल शरीफ यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी गाझा सिटीच्या पूर्व आणि दक्षिण भागात वाढलेल्या बॉम्बहल्ल्‌‍यांबद्दल माहिती दिली होती. या व्हिडीओमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकायला मिळत आहेत.

या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनचे भाषांतर केले असता, त्यामध्ये ”गेल्या दोन तासांपासून सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत, गाझा शहरावरील इस्रायलचे हल्ले तीव्र झाले आहेत,” असे म्हटले आहे

पॅलेस्टिनी पत्रकारांच्या गटांनी या हत्यांचा निषेध केला आणि हे हल्ले चालू असलेल्या संघर्षादरम्यान माध्यम स्वातंत्र्याला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये गाझा येथे संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलकडून पॅलेस्टिनी पत्रकारांवर हमासशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आलेले आहेत.

इस्रायले जारी केलेल्या आकडेवारीनुसार हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून 1,200 लोकांचा बळी घेतला आणि 251 लोकांना ओलिस ठेवले तेव्हापासून हे युद्ध पेटले आहे, तेव्हापासून इस्रायली हल्ल्‌‍यांमध्ये 61,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.