नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
दुचाकीला ट्रकनं कट मारल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना जबलपूर नागपूर महामार्गावर रविवारी दुपारी घडली. मात्र अपघातानंतर महामार्गावर एकही वाहन न थांबल्यानं पतीनं पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून नेला. ग्यारसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव आहे, तर अमित यादव असं पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून नेणाऱ्या पतीचं नाव आहे. अमित यादव हे मूळचे मध्यप्रदेशातील सिवनीचे रहिवासी आहेत. मात्र मागील काही दिवसापासून ते नागपूरमधील लोणारा इथं कामानिमित्त राहत होते. ”या अपघातात मृत झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हा काय प्रकार आहे, हे स्पष्ट होईल,” अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
नेमका काय आहे प्रकार ? : ”दुचाकीस्वार व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी अपघात नागपूर जबलपूर मार्गावरील देवलापार या भागात झाला. तिथून मृतदेह कोराडी इथं आणायचा होता. कोणतंही वाहन न मिळाल्यानं तो मृतदेह गाडीवर बांधून नेत होता. पोलिसांना याबाबत सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका हा काय प्रकार आहे, हे स्पष्ट होईल,” असं पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.
रक्षाबंधनासाठी गेले होते मध्यप्रदेशात : यादव पती पत्नी मध्यप्रदेशच्या सिवनी, येथील रहिवासी आहेत. ते मागील 10 वर्षापासून कोराडी नजीक लोणारा या ठिकाणी वास्तव्यास होते. रक्षाबंधन असल्यानं अमित हे दुचाकीनं लोणारा इथून देवलापार मार्गे करणपूरला येत होते. मात्र जबलपूर नागपूर महामार्गावर त्यांच्या दुचाकीला ट्रकनं कट मारला. यावेळी त्यांची पत्नी खाली पडून मृत झाली. मात्र महामार्गावर मदतीची याचना केल्यानंतर कोणतंही वाहन थांबलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
मृतदेहासोबत अनेक किलोमीटरचा प्रवास : आधी कुणी ही थांबायला तयार नव्हतं. त्यानंतर मात्र, मृतदेह दुचाकीवर नेत असताना अनेकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भीतीनं थांबायला ते तयार नव्हते. अखेर महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी अडवून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
पोलिसांनी ‘ही’ दिली माहिती : ग्यारसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव आहे तर अमित यादव असं पतीचं नाव आहे. ”महाराष्ट्र- मध्यप्रदेशच्या सीमेवरील देवलापार भागातील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनचे सुमारास मागून आलेल्या भरधाव ट्रकनं दुचाकीला कट मारला, त्यामुळं अमित यांची पत्नी ग्यारसी यादव या खाली पडल्यानं ट्रकच्या चाकाखाली आल्या. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला,” असं अमित यादव यांनी पोलिसांना सांगितलं.
