अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या बोगस मतदारांच्या मुद्द्यावरुन सुरू झालेल्या राजकीय वादाचे पडसाद आता अहिल्यानगर जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघातील मतदार नोंदणीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यात शाब्दिक चकमकी रंगल्या आहेत.
मतदार नोंदणीबाबत केलं वक्तव्य : राहुल गांधींनी बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित करताना, शिर्डी मतदारसंघातील विखे यांच्या संस्थेशी संबंधित मतदार नोंदणीबाबत वक्तव्य केलं होतं. या आरोपांना समर्थन देत बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. ”राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यायला हवीत. आयोगाने सॉफ्ट कॉपी न देता ट्रकभर कागद पाठवले. सहा महिन्यांच्या तपासणीनंतर अनेक मतदारांनी विविध राज्यात मतदान केल्याचं समोर आलं. आयोगाने भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न केला. जो लोकशाहीसाठी धोकादायक आहे,” असा आरोप थोरात यांनी केला होता.
‘ते’ स्वत:चं अपयश झाकण्यासाठी बेताल बोलतात : राहुल गांधींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळ्याचा आरोप केला. या आरोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ”राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते स्वत:चं अपयश झाकण्यासाठी बेताल बोलत आहेत. तेलंगणात सरकार आल्यावर बोगस मतदानाचा आरोप केला का? कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का? लोकांनी महाविकास आघाडीला धुडकावून लावलं आहे. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले. राहुल गांधी भारतात कमी आणि परदेशात जास्त बोलतात. बोगस मतदानाबाबत शपथपत्र दिलं, तर आरोप सिद्ध करावे लागतील. नाहीतर गुन्हा दाखल होऊन सदस्यत्व रद्द होऊ शकतं. मात्र, कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही”, असाही टोला यावेळी विखे पाटलांनी राहुल गांधींना लगावलाय.
..तरी निकालात फरक पडत नाही : काँग्रेस नेते थोरात यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ”राहुल गांधींना ज्या मतदारसंघात आक्षेप आहे. तेथील आमदारांनी मतदान यादीवर हरकत का घेतली नाही? शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांना 65 हजार मताधिक्य मिळाले. त्यांनी म्हटलेली पाच हजार मते वजा केली तरी निकालात फरक पडत नाही. हे आरोप नैराश्यातून केले जात आहेत. राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलत आहेत. न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे की न्यायालयात पुरावे सादर करून इलेक्शन कमिशनच्या विरोधात भांडता येते. पण ज्यावेळी इलेक्शन कमिशन प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगते, त्यावेळी मागे सरकले, हा फक्त त्यांचा एक फुसका बॉम्ब आहे”.
कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न : थोरात यांच्या आरोपांवर आमदार अमोल खताळ यांनी देखील हल्ला चढवला. ”थोरातांचे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेला प्रयत्न आहे. यात कुठलेही तथ्य नाही. 40 वर्ष निवडून आलात तेव्हा लोकशाही होती. पण आता पराभव झाला तर मान्य करायला पाहिजे. तुमचे नेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर बोलून वैचारिक दिवाळखोरी दाखवतात. कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अशी टीका खताळ यांनी केली.
…तिथे का बोगस मतदान दिसत नाही? : ”शिर्डी आणि संगमनेरबाबत थोरात जे बोलले त्याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं. किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले होते हे संगमनेरमधील जनता जाणते. महायुतीने एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली. त्याचं दु:ख त्यांना जास्त आहे. मतदारसंघ हा कोणाची जहागीरदारी नाही. जिथे काँग्रेसचे राज्य आहे. तिथे का बोगस मतदान दिसत नाही? येणाऱ्या निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं काँग्रेसकडून हा प्रयत्न सुरू आहे. माझा थोरातांना प्रश्न आहे, मत पडताळणीचा अर्ज करून, पैसे भरुन नंतर माघार का घेतली? त्यांना शंका होती, तर मागे का हटले? त्यांच्या आरोपात कुठलंच तथ्य नाही”, असा आरोपही खताळ यांनी केला.
