Spread the love

लखनऊ / महान कार्य वृत्तसेवा

रक्षाबंधनाच्या रात्री कानपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. ही घटना दक्षिण कानपुरातील हनुमंत विहार पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या खाडेपूर इथं घडली. एका तृतीयपंथीयाची आणि त्याच्या दत्तक भावाची हत्या करुन मृतदेह सोफ्यात डांबण्यात आले. या मृतदेहातून दुर्गंधी येत असल्यानं याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपासणी केली असता, दोघांचे मृतदेह आढळून आले. यातील तृतीयपंथीयाचा फोन चार दिवसांपासून बंद असल्यानं हा खून चार दिवसांपूर्वी करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे या घरातील सामान विखुरलेलं असल्यानं मारेकऱ्यांनी घरात लुटमार केल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल : खाडेपूर इथल्या तृतीयपंथीयाची त्याच्या दत्तक भावासह हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून दक्षिण कानपूरचे पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करुन पुरावे गोळा केले. पोलीस पथकानं आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील शोधण्यास सुरुवात केली आहे. लवकरच दुहेरी हत्याकांडाचा उलगडा होईल, असा पोलिसांचा दावा आहे.

तृतीयपंथीयासह त्याच्या दत्तक भावाची हत्या : मैनपुरी जिल्ह्यातील किशानी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या धर्मगंडपूर इथली रहिवासी गुड्डी हिनं याबाबतची माहिती दिली. गुड्डी म्हणाली की, ”तिची मुलगी काजल (25) एका महिन्यापूर्वी निवृत्त सैनिकाच्या घरी भाड्यानं राहायला आली. मात्र अचानक अशी घटना घडेल, हे कोणालाही माहिती नव्हतं. तिनं माझ्या भावाचा मुलगा देव (12) याला दत्तक घेतलं आहे. काजल कानपूरमध्ये राहत होती आणि तिचा भाऊही तिथंच शिकत होता. काजलनं भावाला सहावीच्या वर्गात प्रवेश दिला. दोघांचीही हत्या करण्यात आली आहे.”

काजलचा फोन चार दिवसांपासून आहे बंद : घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिसांना महत्वाची माहिती दिली. गोलू आणि आकाश नावाचे दोन तरुण अनेकदा काजलला भेटायला येत होते, असं त्यांनी यावेळी सांगितलं. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी म्हणाले की, ”या तरुणांची चौकशी केली जाईल. कदाचित त्यांच्याकडून हत्येचा काही सुगावा सापडेल. काजलचे कॉल डिटेल्स देखील शोधले जात आहेत.” तर काजलचा मोबाईल मागील 4 दिवसांपासून बंद होता, असं काजलच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.