पुणे / महान कार्य वृत्तसेवा
मटेरियल्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (एमएमआय) ने शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी नाशिकमधील देवळाली येथील एअर फोर्स स्टेशनवर अग्निवीरवायु प्रशिक्षणार्थींच्या 8 आठवड्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आयोजित केला होता.
अकाउंट्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट या सब-स्ट्रीममध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थींना या कार्यक्रमात समारोप देण्यात आला. 36 महिलांसह एकूण 262 अग्निवीरवायू प्रशिक्षणार्थींनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
या समारंभात झालेल्या संचलनाचे निरीक्षण एअर फोर्स स्टेशन देवळालीचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर मनीष डायलानी यांनी केले. या कार्यक्रमाला अइइेंअ (थ्) च्या अध्यक्ष रेणू डायलानी देखील उपस्थित होत्या. याशिवाय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. एअर कमोडोर यांनी आपल्या भाषणात परेड कमांडर आणि सर्व सहभागींचे उत्कृष्ट पोशाख तसेच शिस्तबद्ध अचूक आणि समन्वय पूर्ण संचलन याबद्दल अभिनंदन केले. या संचलनातून प्रशिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि शिस्त प्रतिबिंबित झाली असे ते म्हणाले. त्यांनी एमएमआय चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन एस. सुरेश कुमार आणि त्यांच्या टीमचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी समर्पित प्रयत्नांबद्दल कौतुक केले.
त्यांनी प्रशिक्षणार्थींना ज्ञानाचा मजबूत पाया रचण्याचे, शिकण्याची उत्सुकता कायम राखण्याचे आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय हवाई दलाच्या ‘ध्येय, सचोटी आणि उत्कृष्टते’च्या मुख्य मूल्यांचे पालन करून राष्ट्र निर्मितीसाठी सेवा देण्याचे आवाहन केले.
या भव्य कार्यक्रमात महिला अग्निवीरवायु प्रशिक्षणार्थींनी प्रेरणादायी ड्रिल सादरीकरण आणि संगीन लढाईचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यातून प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यात रुजवलेली शिस्त आणि व्यावसायिकता स्पष्टपणे दिसून आली. संलग्न सेवा, नागरी क्षेत्रे आणि एअर फोर्स स्टेशन देवळाली येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अग्निवीरवायु प्रशिक्षणार्थींनी केलेल्या या उत्कृष्ट संचलनाचे कौतुक केले.
