Spread the love

मिरज / महान कार्य वृत्तसेवा

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल मिरज मधील रिटेल विभागाच्या पुढाकाराने व पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत, पीएम श्री मिरज हायस्कूल, मिरज येथे विद्यार्थ्यांनी ‘राखी निर्मिती व विक्री’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला कौशल्य, उद्योजकता वृत्ती, सर्जनशीलता, सेवाभाव आणि आर्थिक साक्षरता विकसित करणे हा होता.

या उपक्रमाला  सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त सत्यम गांधी यांची प्रेरणा तसेच पीएम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक तथा उपायुक्त सन्माननीय स्मृती पाटील यांचे  प्रोत्साहन प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय राजेंद्र नागरगोजे यांचे मार्गदर्शन  यामुळे अनेक  विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जोमाने सहभाग घेतला.

राखी बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी दोरे, मणी, मोती, चमकी, रेशीम धागा आणि सजावटीचे साहित्य वापरून आकर्षक राख्या तयार केल्या. यावर्षीच्या उपक्रमाची खास बाब म्हणजे विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या त्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींना –  उदा.पोलीस विभाग, अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा–यांना राखी पौर्णिमेनिमित्त शाळेतील विद्यार्थिनी स्वतः जाऊन राखी बांधणार आहेत. राखी पौर्णिमेच्या दिवशीही हे कर्मचारी कर्तव्यावर असतात, त्यामुळे विद्यार्थिनींच्या या सेवाभावातून त्यांच्या त्यागाला भावपूर्ण सलाम करण्यात येणार आहे.

तयार झालेल्या राख्यांचे शाळेत आणि स्थानिक बाजारात विक्री स्टॉल लावण्यात आले. विक्री दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून राखीचे सांस्कृतिक महत्त्व आणि स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगितली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी उत्पादन निर्मिती, विक्री, किंमत ठरविणे, नफा-तोटा समजून घेणे, ग्राहक सेवा यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचा अनुभव घेतला. विक्रीतून जमा झालेली रक्कम शाळेच्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे.

मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे म्हणाले, “विद्यार्थी जर लहान वयातच व्यवसाय आणि सेवाभाव शिकले, तर ते समाजातील आदर्श नागरिक बनतात.” प्रशासन अधिकारी स्मृती पाटील यांनी सांगितले की, “राखी तयार करणे हा केवळ कला उपक्रम नाही, तर तो आत्मनिर्भरतेकडे आणि समाजसेवेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.” आयुक्त सत्यम गांधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना “अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक जीवनाभिमुख, संवेदनशील आणि प्रेरणादायी बनते” असे मत व्यक्त केले.