मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालयाच्या वतीने कोल्हापूर येथील संभाजी महाराज क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आंतर-संचालक क्रीडा नेमबाजी स्पर्धेला सुरूवात झाली. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक आणि तांत्रिक सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील विविध संचालक मंडळांमधील उत्कृष्ट एनसीसी कॅडेट नेमबाज सहभागी झाले असून ते रायफल आणि पिस्तुल नेमबाजीच्या विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करणार आहेत. क्रीडा भावना, अचूकता आणि शिस्त यांचा प्रसार करणे, सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी देशातील प्रतिभावान नेमबाज शोधणे तसेच त्यांचा विकास करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
उद्धाटन समारंभाला एनसीसी ग्रुप कमांडर बिगेडियर आर के पैठणकर, एनसीसी जीपी मुख्यालय कोल्हापूर, वरिष्ठ एनसीसी अधिकारी, नागरी प्रशासनातील मान्यवर आणि क्रीडा अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर एनसीसी ग्रुपच्या ग्रुप कमांडर पैठणकर यांनी आपल्या भाषणात एकाग्रता, संयम आणि मानसिक ताकद वाढवणारा खेळ म्हणून नेमबाजीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा कार्यक्रम तरुण कॅडेट्सना नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि एनसीसीच्या ”एकता आणि शिस्त” या बीदवाक्याचे पालन करण्यास प्रवृत्त करेल.
संभाजी महाराज क्रीडा संकुल, हे आपली आधुनिक शूटिंग रेंज आणि सुविधांसह, राष्ट्रीय शूटिंग मानांकनानुसार आणि कठोर सुरक्षा व्यवस्थेसह स्पर्धा आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि आंतर-संचालक सौहार्दपूर्ण संबंधांसाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करत असून यामुळे भारताच्या विविध प्रदेशातील छात्रांमधील बंध दृढ होत आहेत.
