पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यातील खडकवासला तलावाच्या विलोभनीय परिसरात स्थित प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी), पुणे, ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील एक आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेअंतर्गत अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्या शाखांच्या विविध विभागांअंतर्गत एम.टेक., एम.एस.सी. आणि पीएच.डी. पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. राष्ट्रीय सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने या संस्थेत उच्चस्तरीय संशोधन आणि अध्यापन कार्यांवर भर दिला गेला आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसह, विविध संरक्षण विभागांसाठी प्रगत सेन्सिंग, रडार तंत्रज्ञान, माहितीसाठा शास्त्र, क्वांटम तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरणीय व्यवस्था, यांत्रिक आणि एरोस्पेस व्यवस्था, लेझर आणि ऑप्टिकल प्रणाली, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शस्त्र प्रणाली यांसारख्या संरक्षण विषयक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आली आहे. जुलै 2024 पासून प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेने एल अँड टी च्या संरक्षण अधिकाऱ्यांसाठी इंडस्ट्रियल सिस्टीम इंजिनिअरिंग अंतर्गत एम.टेक. अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला. जुलै 2025 या शैक्षणिक वर्षापासून, प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने प्रत्यक्ष सेवेत असलेल्या व्यावसायिक तज्ञांसाठी मॉडेल – आधारित सिस्टीम इंजिनिअरिंगमध्ये (मुख्य विषय) नवीन एम.टेक. अभ्यासक्रम सुरू केला जणार आहे. यासोबतच धातू विज्ञान आणि साहित्य अभियांत्रिकी आणि उपयोजित भौतिकशास्त्र या आणखी दोन विभागांच्या अभ्यासक्रमांनाही राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाची मान्यता मिळाली आहे.
प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेचा 14 वा पदवीदान सोहळा आज दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी या पदवीदान सोहळ्याला संबोधितही केले. प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेचे उप-कुलगुरु डॉ. बी. एच. व्ही. एस. नारायण मूर्ती तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसह, शिक्षण क्षेत्र, तिन्ही सैन्य दले आणि उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित अतिथी आणि निमंत्रित या सोहळ्याला उपस्थित होते.
या 14 व्या पदवीदान सोहळ्यात, 298 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली. यात 206 एम.टेक. चे विद्यार्थी, 68 एम.एस.सी. आणि 24 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या वर्षी पदवीदान सोहळ्यात एकूण 18 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
या 14 व्या पदवीदान सोहळ्याच्या निमित्ताने, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव डॉ. एस. व्ही. कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती देशाच्या विकासाला सतत चालना देत राहील आणि सुशिक्षित तरुणांना आत्मनिर्भर होण्यास मदत करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पदवी प्राप्त केलेल्या अधिकारी विद्यार्थी आणि नियमित विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या अत्यधुनिक तंत्रज्ञानांचा अंगिकार करून तसेच आघाडीचे उद्योजक बनून देशाची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करण्यासाठी तसेच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी विद्यार्थी कायमच योगदान देत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
