दबक्या आवाजातील चर्चेने अस्वस्थता
विशेष प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
स्वच्छ सुंदर कारभार असा आव आणलेल्या हातकणंगले नगरपंचायतीत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची कुजबूज सुरु झाल्याने नगरपंचायत वर्तुळात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. 2022 रोजीच्या लेखा परीक्षण अहवालात ही माहिती समोर आल्याचे कळते. परंतू, संबंधित घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी अडकल्याने प्रकरण दडपले जात असल्याची चर्चा सुरु आहे. हातकणंगलेकरांच्या करातून अधिकाऱ्यांना पगार मिळतो. परंतू, त्या पगारात त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक खर्च भागत नसेल म्हणून करदात्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? असा संताप या निमित्ताने व्यक्त होवू लागला आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खर्चावर मर्यादा ठेवाव्यात, असा उपरोधात्मक टोलाही शहरवासिय लगावत आहेत.
2022 ला नगरपंचायतीचं लेखापरीक्षण झालं. या लेखापरीक्षणात अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. लेखापरीक्षण अहवाल देत असताना लेखा परीक्षकांनी यावर स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. कर्मचारी,विविध विभागांवर काम न करता काम झाल्याचे दाखवून खर्च टाकण्यात आलेला आहे. काही कर्मचाऱ्यांना काही लाखांची रक्कम जादा स्वरुपात दिलेली आहे, असे कळते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चक्रवाढ व्याजासह पैसे वसुल करावेत, अशी मागणी लोकांमधून सुरु झाली आहे. आता पहावे लागेल मुख्याधिकारी विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे या प्रकरणाच्या मुळाशी जातात का?
उच्च न्यायालयात जाणार
संबंधित प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. तीन वर्षात नगरपंचायत प्रशासनानं या संदर्भात काहीही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे जनतेच्या कष्टाचा कराचा पैसा कोणा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खिशात बेकायदेशीर जात असेल तर त्यांच्याकडून तो वसुल झाला पाहिजे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात गांभीर्यानं घेतलं नाहीतर आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागेल.
- राजू गोरे
सामाजिक कार्यकर्ते, हातकणंगले
