इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
सध्या श्रावण महिना सुरु असल्याने तीर्थस्थळांना भेटी देण्याकडे भाविक भक्तांचा ओढा वाढला आहे. त्यांची गरज ओळखून इचलकरंजी आगारात दाखल झालेल्या 10 नव्या कोऱ्या बसेस लालपरीमधून तीर्थस्थळ यात्रा घडवण्याचा संकल्प केला आहे. यास कुणाला नोंदणी करावयाची असेल तर त्यांनी आगाराकडे संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले आहे.
श्रावण महिन्यामध्ये 11 मारुती, त्र्यंबकेश्वर, रामलिंग, अंबाबाई मंदीर, जोतीबा मंदीर, आळते रेणुका मंदीर, नृसिंहवाडी, शनी शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी ठिकाणी भाविक भक्त जातात. जर एकत्रित 40 भाविकांनी नोंदणी केल्यास त्यांच्यासाठी आगाराकडे असलेल्या नविन लालपरीतून त्यांची तीर्थयात्रा घडवण्याचा मानस इचलकरंजी आगाराने केला आहे. या संधीचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले आहे.