गुन्हा दाखल झाला ठाकरेंच्या आमदाराच्या पोरावर !
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण तापलंय. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वरळी कोळीवाड्यातील राड्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. आदित्य ठाकरे काही वेळ एकनाथ शिंदे यांच्याकडे रोखून पाहत होते. याला निमित्त ठरला वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघातील कोळीबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. एकाच ठिकाणी दोन्ही नेते आमनेसामने आले. त्यामुळे काही काळीसाठी कोळीवाड्यात तणाव निर्माण झाला. अरुंद गल्लीत नेते आणि कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं मोठ्या प्रमाणात धक्काबुकीची झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे राडा टळला. पण त्यामुळे या परिसरात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय राडा पोलिसांमुळे टळला असला तरी शाब्दिक युद्धाला मात्र तोंड फुटलं नाही तरचं नवल. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदेवर धक्काबु्क्की केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर सिद्धेश शिंदेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे वादाला चांगलीच धार आलीय. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील रस्त्यांच्या कामा विषयीच्या बैठकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या देहबोलीची चर्चाही त्यावेळी झाली होती. आदित्य ठाकरे शिंदेंकडे नजर रोखल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. आणि याचीच प्रचिती वरळी कोळीवाड्यातही आली.
