नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीतील बोगस मतदार प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे. रावत यांनी स्पष्ट केलं की, बेंगळुरुमधील कथित बोगस मतदारांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी. त्यासाठी आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता तपास सुरू करायला हवा असा सल्ला रावत यांनी दिला आहे.
‘द टेलिग्राफ’शी बोलताना ओ पी रावत म्हणाले, ”मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना, कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्यास आम्ही तात्काळ स्वत:हून तपास सुरू करत होतो आणि जनतेसमोर सत्य ठेवत होतो. अशा प्रकरणांत आम्ही पक्षांकडून आधी तक्रार मागत नव्हतो.”
राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेत आरोप केला की, 2024 मधील लोकसभा निवडणुकीत बेंगळुरु सेंट्रल मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखांहून अधिक बोगस मतदार होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही मतदारांचे नाव दोन किंवा अधिक वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदवले गेले होते आणि त्यांनी दोन्हीकडे मतदान केले. एकाच व्यक्तीची वारंवार नोंदणी झाली आहे, चुकीचे पत्ते आहेत, एका खोलीच्या घरात 80 जणांचे नोंदणी झाली आहे आणि काही मतदार इतर राज्यांतही नोंदणीकृत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
काँग्रेसने 8 ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये या मुद्द्यावर आंदोलन केले. त्याच दिवशी सकाळी काही लोकांना मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी आल्याने, राहुल यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने छेडछाड केली असल्याचा संशय व्यक्त झाला. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळले.
निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया
आयोगाने एका ‘एक्स’ पोस्टमध्ये राहुल गांधींना आव्हान दिलं की, प्रत्येक कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनीही काँग्रेसला पुरावे सादर करण्यास सांगितले.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेला वाद आता निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. आगामी काळात यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
