इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेच्या लाभार्थ्यांचे मागील आठ महिन्यांपासून थकीत असलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी इचलकरंजी शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. तत्पूर्वी पुरवठा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आठ महिन्यांपासून थकीत असल्याने लाभार्थ्यांना वारंवार पुरवठा कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी लाभार्थी पात्र असूनही त्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबतच्या लाभार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने पुरवठा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदन पुरवठा अधिकाऱ्यांना देऊन थकीत अनुदान आणि शिधापत्रिकेवरील धान्य त्वरीत न मिळाल्यास रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.
या आंदोलनात अजित मिणेकर, राजन मुठाणे, हारुण खलिफा, सुदाम साळुंखे, शेखर पाटील, युवराज शिंगाडे, डॉ. विलास खिलारे, साजिद मकानदार, तोसिफ लाटकर, योगेश कांबळे, मिलिंद कुरणे, रोहित जावळे, रवि वासुदेव, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
