इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील कॉम्रेड के.एल. मलाबादे चौकात पूर्णत्वास येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी लोकवर्गणी संकलन सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या सहभागातून संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार असून या धर्मकार्यात सर्वांनी आपला सहभाग स्वच्छेने नोंदवावा, असे आावाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाराज (गुरुजी) यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपली हयात घालवली. त्यांच्या विचाराचे आणि प्रेरणेचे स्मारक शहरात उभे रहावे यासाठी के.एल. मलाबादे चौकात काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्या निधीतून विविध कामे होत असली तरी चबुतर्यासह २३ फुट उंची असणार्या महाराजांच्या या स्मारकाच्या पुतळ्यासाठी सुमारे २५ लाख रुपयांची निधी अपेक्षीत आहे. यामध्ये प्रत्येकाचा वाटा असावा या भावनेतून निधी संकलन करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी या कार्याचा शुभारंभ होऊन १८ सप्टेंबर २०२५ निधी संकलनाचे काम बंद करण्यात येईल.या सेवा कार्यात सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निधी संकलनाचा संकल्प आम्ही सोडला असून प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा संकल्प पोहचवणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अरविंद माने, सचिव प्रसाद जाधव, खजिनदार युवराज बोने पाटील, मंगेश मस्कर, महेश जाधव, अॅड. शांतीभुषण मुदगल, सुनिल इंगळे, अभिनव सुतार, संतोष घोरपडे उपस्थित होते.
