Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुण्याहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानाचं सगळं चेकिंग झालं. प्रवासी व्यवस्थित बसले सगळं सेट झालं आणि प्रवासाची सुरुवात होते न होते तोच मोठं संकट आलं. पुणे विमानतळावरुन विमानाने धावपट्टीवर वेग पकडला. टेकऑफ करण्याच्या तयारीत असतानाच काहीतरी आवाज झाला. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्याने तातडीनं इमर्जन्सी लॅण्डिंग केलं.

या विमानात 140 प्रवासी होते. विमान पुण्याहून भुवनेश्वरला निघालं होतं. ही घटना समजताच तातडीनं टीम रनवेवर आली. त्यांनी तपासणी केल्यावर काहीतरी बिघडलंय हे लक्षात आलं. विमानात बिघाड, काहीतरी तक्रारी येण्याच्या घटना काही नवीन नाहीत. काही तांत्रिक कारणांमुळे इर्मजन्सी लॅण्डिंग करावं लागत असल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र आता चक्क एक पक्षीच विमानाला धडकल्याचं तपासातून समोर आलं.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या पुणे-भुवनेश्वर र्घ्‌ें-1098 विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण थांबवण्यात आलं. विमानात 140 प्रवासी होते आणि क्षणार्धात झालेल्या पायलटच्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचले. धावपट्टीवर वेग घेत असताना अचानक उजव्या इंजिनात पक्षी आदळला आणि त्यातून ठिणगी उडायला लागली, अचानक आगही लागली. पायलटने प्रसंगावधान राखत त्वरित ब्रेक लावले आणि विमान थांबवले.

सीट क्रमांक 22ऊ वर बसलेले प्रवासी मोहम्मद नदीम यांनी सांगितलं, ”इंजिनमधून ज्वाला निघाल्याचं आम्ही पाहिलं आणि क्षणात पायलटने विमान थांबवलं. थरारक क्षण होता, पण पायलटच्या सजगतेने जीव वाचले.” या अपघातात विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले. पायलटने न्न्‌1 वेग गाठण्याआधीच निर्णय घेतल्यामुळे टेक-ऑफ टाळण्यात यश आलं. अन्यथा हवेत हा प्रकार घडला असता. ही पुणे विमानतळावरील 2025 मधील बारावी ‘बर्ड हिट’ घटना आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अशा तब्बल 145 घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या कुत्रे, बिबट्या आणि पक्ष्यांच्या अडथळ्यांमुळे प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यात आली, मात्र अनेकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.