नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे हे आज विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मधल्या काळात इंडिया आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगवर चर्चा झाली. आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या मुद्यावरही थेट भाष्य केले.
एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा?
उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या काही दिवसांत भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप-एनडीएने मराठी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आधी उमेदवार जाहीर होऊ द्या, त्यानंतर पाहू असे उद्धव यांनी म्हटले. सध्या आम्ही कोणाला पाठिंबा देणार, यापेक्षा धनगड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपती पदावरून राजीनामा का दिला, सध्या ते कुठं आहेत, याची माहिती अधिक महत्त्वाची आहे. ते कुठं आहेत, हे माहित असतं तर आपण नक्कीच त्यांची भेट घेतली असती, असेही ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, याआधीदेखील शिवसेनेने एनडीएच्या आघाडी असताना राष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मराठी व्यक्ती म्हणून पाठिंबा दिला होता. आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने मराठी उमेदवार दिल्यास ठाकरे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.
