छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
‘एजंट’मार्फत लग्नासाठी 1 लाख 80 हजार रुपयांमध्ये मुलगी देण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी खोटे लग्न लावून, पैसे घेतले आणि लग्नानंतर नवरीला घेऊन परत जात असताना, टोळीने वाहनावर हल्ला करून नवरीला पळवून नेले. या प्रकरणी एजंट नंदकुमार चव्हाण (रा. कोरेगाव, जि. सातारा), नवरी बनण्याचे नाटक केलेली दिशा आणि तिची सोबतीण मोनिका यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नासाठी 1 लाख 80 हजारांची मागणी
सातारा जिल्ह्यातील आर्वी गावातील 39 वर्षीय शेतकरी महेश यादव यांचे लग्न ठरत नव्हते. 25 जुलै रोजी त्यांच्याच तालुक्यातील चव्हाण नावाच्या एका व्यक्तीने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका मुलीचे स्थळ असल्याचे सांगितले. दिशा नावाच्या मुलीचे फोटो दाखवल्यानंतर कुटुंबाने लग्नाला होकार दिला. त्यानंतर मोनिका नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधून लग्नासाठी 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. 29 जुलै रोजी यादव कुटुंब छत्रपती संभाजीनगर शहरात आले. मोनिकाने त्यांना दिशाच्या आंबेडकरनगर येथील घरी नेऊन चहापाणी दिले. त्यानंतर सर्वांनी साड्या आणि कपड्यांची खरेदी केली.
‘कोर्ट मॅरेज’च्या नावाखाली फसवणूक
आरोपींनी यादव कुटुंबाला कौटुंबिक न्यायालयासमोर नेत येथेच कोर्ट मॅरेज केले जाते, असे खोटे सांगून एका वकिलाकडे नेले. तेथे नोटरी बनवून लग्न झाल्याचे जाहीर केले. तेव्हा महेश यांनी मोनिकाला 1 लाख रुपये रोख आणि 80 हजार रुपये ऑनलाइन पाठवले.
लग्नाच्या आनंदात महेश आपल्या नव्या नवरीसह साताऱ्याच्या दिशेने निघाले. त्यांच्याकडे लग्नाची कागदपत्रे, 35 हजार रुपये रोख आणि कपड्यांची बॅग होती. रात्री 8.30 वाजता त्यांची कार वाळूज परिसरात आली असता, अचानक त्यांना रस्त्यात अडवण्यात आले. चारचाकीतून उतरलेल्या गुंडांनी गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली आणि महेशकडील पैसे घेऊन नवरीसह (दिशा) तिच्या बहिणीने धूम ठोकली. या घटनेने पोलिसांना यात मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे आणि ते अधिक तपास करत आहेत.
