Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

देश शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाहीत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सांगितले. तसेच यासाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत, असंही त्यांनी अधोरेखित केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मला वाटते की, मला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि मी त्यासाठी तयार आहे. ते दिवंगत प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित तीन दिवसांच्या जागतिक परिषदेला संबोधित करीत होते. अमेरिकेने कृषी उत्पादनांसह भारतीय वस्तूंवर टॅरिफ 50 टक्क्‌‍यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय.

भारतातील अन्न उत्पादनात लक्षणीय वाढ झाली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महान शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ एक स्मारक, नाणे आणि टपाल तिकीटदेखील जारी केलंय. ते एक प्रसिद्ध भारतीय कृषी शास्त्रज्ञ होते. 1960 च्या दशकात उच्च उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती आणि आधुनिक कृषी तंत्रांचा अवलंब करून भारतीय शेतीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना भारतात ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्यामुळे भारतातील अन्न उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि शेतकऱ्यांमधील गरिबी कमी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वामिनाथन यांना समर्पित एक स्मारक, नाणे आणि शतकोत्तर स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.

विचारमंथन करण्याची संधी प्रदान करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएस स्वामिनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन केले. ही परिषद शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, विकास व्यावसायिक आणि इतर भागधारकांना ‘सदाहरित क्रांती’च्या तत्त्वांवर चर्चा आणि विचारमंथन करण्याची संधी प्रदान करणार आहे. प्रमुख विषयांमध्ये जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी शाश्वत शेती, हवामान बदलाशी जुळवून घेऊन हवामानाची बाजू मजबूत करणे, शाश्वत आणि समतापूर्ण उपजीविकेसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि विकासात्मक चर्चांमध्ये तरुण, महिला आणि उपेक्षित समुदायांना सहभागी करून घेणे यांचा समावेश आहे. त्यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी एमएस स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन (एमएसएसआरएफ) आणि वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेस (टीडब्ल्यूएएस) संयुक्तपणे एमएस स्वामिनाथन अन्न आणि शांतता पुरस्कार सुरू करतील.