Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

येथील लायन्स क्लब, रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि मराठा आरक्षण संघर्ष समिती यांच्या सहकार्याने कोल्हापूर पोलीस विभागामार्फत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल, ज्यु. कॉलेजमध्ये मिशन झिरो ड्रग्स मोहिमेअंतर्गत कार्यशाळा झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नाइकवडे यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमाचे मुलींच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व तसेच शालेय वयात घ्यायची दक्षता स्पष्ट केली.

गावभाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी अंमलीपदार्थ सेवन विरोधी सुरु केलेल्या या अभियानाचे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीचे महत्व, त्याचे दुष्परिणाम आणि सजगता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी स्वतः व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबातील, समाजातील व्यक्तींना यापासून कसे दूर ठेवता येईल हे सहज आणि सोप्या उदाहरणातून स्पष्ट केले.

निर्भया पथकाच्या वेदिका पाटील, महादेवी पुजारी यांनी पथकाच्यावतीने मुली, महिलांसाठी सुरु असलेले काम, त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यातील तरतुदी, सुरक्षिततेचे पॉवरपॉइंटद्वारे सादरीकरण केले. मुख्याध्यापिका ए.एस.काजी यांनी विद्यार्थिनींना व्यसन म्हणजे काय?, त्या विरोधात विद्यार्थिनींची भूमिका आणि जबाबदारी काय असावी हे स्पष्ट केले. प्रारंभी पर्यवेक्षिका व्ही.एस.लोटके यांनी प्रास्ताविक केले. लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप सुतार, प्रशासक लिंगराज कित्तुरे, पर्यवेक्षक एस.एस.कोळी, आर.एस.रॉड्रीग्युस यांच्यासह गावभागचे पोलीस, निर्भया पथकातील कर्मचारी, विद्यार्थिनी,शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.