इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह दि. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागामध्ये आज स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. स्तनपानाकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे,बालमृत्यू कमी करणे पोषण सुधारणा करणे, पहिले सहा महिने निव्वळ स्तनपान करणे बाबत प्रोत्साहन देण्या करिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे असे मार्गदर्शन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील यांनी उपस्थित रुग्णांना केले.
स्तनपानामुळे बाळ आणि आई दोघानांही आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. बाळाला स्तनपान करताना आईच्या शरीरातून ऑक्सीटोसिन नावाचे हार्मोन बाहेर पडते ज्यामुळे आईला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो. स्तनपानामुळे आई आणि बाळ यांच्यात एक भावनिक नाते निर्माण होते जे दोघांसाठी फायद्याचे असते असे बालरुग्ण विभागाच्या परीसेवीका श्रीम.सविता सणगर सिस्टर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी बालरुग्ण विभागामधील बालकांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक एका सुंदर नृत्य माध्यमातून दाखवले. तसेच बालरुग्ण विभागातील अधिपरिचारिका श्रीम.रोहिणी चव्हाण,श्रीम.मयुरी मस्के, डिना बिरांजे, प्रियांका दोरुगडे यांनी सुंदर एक रोल प्ले सादर केला. व स्तनपानाविषयी उपस्थितांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी, बालरोगतज्ञ डॉ.संदीप मिरजकर, डॉ,इम्रान तांबोळी रुग्णालयाच्या अधिसेविका चारुशिल्पा येमल, सहा.अधिसेविका सीमा कदम, बालरुग्ण तज्ञ परिचारिका सोनल माने, सार्वजनिक आरोग्य परिचारिका उपस्थित सर्व रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.
