माधुरी परतण्याच्या आशा पल्लवीत
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा (विकास लवाटे, सुभाष भस्मे)
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (ता.शिरोळ) येथील मठामध्ये तब्बल ३५ वर्षे वास्तव्य करणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासन सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत केली. तसेच या प्रकरणी नांदणी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान स्थानिक ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
नांदणी मठातील महादेवी हत्तीण ही केवळ एक प्राणी नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे, श्रद्धेचे आणि जनभावनांचे प्रतीक मानली जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘पेटा’ या प्राणी कल्याण संस्थेने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे हत्तीणीची योग्य देखभाल होत नसल्याचे नमूद करून तिला गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ या प्राणिसंवर्धन केंद्रात हलवण्यात आले होते. या निर्णयाविरोधात नांदणी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात जनआंदोलनाचा भडका उडाला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस स्वस्तीश्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामी, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, अमल महाडीक, डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ललित गांधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महादेवी हत्तीण ही न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारामध्ये हलवण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाची थेट भूमिका नव्हती. मात्र, या हत्तीणीशी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या भावना, श्रद्धा आणि अस्मिता जोडलेली आहे. त्यामुळे शासन स्तरावरूनही आम्ही सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करून तिच्या पुनःस्थापनेसाठी प्रयत्न करू. तसेच नांदणी मठाने स्वतंत्र याचिका दाखल करावी. सरकार त्या याचिकेला पूर्ण ताकदीने पाठिंबा देईल. हत्तीणीची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथकही तयार करण्यात येईल.
हत्तीणीच्या स्थलांतराच्या काळात नांदणी येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी दगडफेक आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांबाबत माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे, डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आवाज उठवला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी स्पष्ट ग्वाही दिली.
महादेवी हत्तीण केवळ धार्मिक प्रतीक नसून अनेक जाती-धर्मांच्या लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. तिला परत नांदणी मठात आणण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन तिच्या परतीसाठी ठाम आणि सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे अधोरेखित केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जनतेच्या आशा पुन्हा उजळल्या आहेत.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, सदाभाऊ खोत, भालचंद्र पाटील, सागर संभुशेट्टे, सावकर मादनाईक, आप्पासो भगाटे, सागर पाटील, अॅड. मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
